Mar 25, 2009

निर्णय : बरोबर की चूक


आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला महत्वाचे निर्णय घेताना आपल्याला एक भीती किंवा दडपण वाटत असतं की आपण जो निर्णय घेवू तो बरोबर (correct) असावा. पण बरोबर निर्णय म्हणजे नेमकं काय असतं? आपल्याला निर्णय घेताना खरंच माहित असतं का की हा निर्णय बरोबर असणार आहे की चूक ?



माझ्या मतानुसार आपल्याला हे कधीच माहित नसतं की आपला निर्णय बरोबर आहे की चूक! आपण फक्त अंदाज करत असतो... त्यासाठी आपण काही गोष्टी गृहित धरतो आणि त्या वेळेस ज्ञात असणाऱ्या माहितीच्या आधारे, आपले आणि इतरांचे अनुभव वापरून काही ठोकताळे वापरून भाकीत करतो; नंतरची वास्तविक परिस्थितीच ठरवते की आपला निर्णय बरोबर आहे की चूक !



हे जरा पचायला अवघड जातंय ना? मग आपण एखादं उदाहरण बघुयात - आपल्या मुलासाठी शाळा शोधणे !



आपल्या मुलाला कुठल्या शाळेत घालायचं हे ठरवताना आपल्या काही अपेक्षा ठरलेल्या असतात... उदाहर्नार्थ... इंग्लिश मीडियम पाहिजे, शाळा घरापासून जवळ पाहिजे, शाळा चांगली पाहिजे, फार महाग नको, वगैरे.

ह्या सगळ्या अपेक्षा मध्ये बसणारी शाळा सापडवताना खरच किती दम-छाक होते ना ? शेवटी आपण एक शाळा निवडतो , पण ती खरंच योग्य आहे की नाही हे कळायला खूप वर्षे जावी लागतात, किंवा लगेच काही महिन्यातच आपल्याला कळतं की आपण ह्या शाळेबद्दल ऐकलेलं सगळंच काही खर नव्हतं.


मग आपण असं काय केलं म्हणजे आपला निर्णय बरोबर येईल?


पहिली अणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे ठाउक पाहिजे की आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे? म्हणजे आपण ज्या कुठल्या गोष्टीबद्दल निर्णय घेत असू, त्या गोष्टीतून आपण नक्की काय मिळवणार आहोत? उदाहर्नार्थ शाळेकडून आपण मुख्यत: चांगल्या शिक्षणाची अपेक्षा करतो. ह्याचाच अर्थ आपण शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत जास्त खबरदारी घेतली पाहिजे अणि त्यासाठी आपण काहीच compromise करू शकत नाही.
याप्रमाणे आपल्या सगळ्याच अपेक्षा क्रमवारिने लावून त्यांच्या महत्वाप्रमाने त्यांची पुर्तता होतीये का नाही ते बघायला पाहिजे. जी अपेक्षा जास्त महत्वाची असेल त्याची पुर्तता होणे जास्त गरजेच आहे. ह्याचाच अर्थ जी अपेक्षा कमी महत्वाची आहे त्यात आपण compromise करू शकतो. एकदा का आपल्याला कळलं की आपण कुठे compromise करू शकतो अणि कुठे नाही, की निर्णय घ्यायला जरा सोपं जातं.


एखाद्या अपेक्षित गोष्टीची पुर्तता होतीये की नाही हे पाहण्याच्या पण बऱ्याच पद्धति आहेत. आपण जितक्या जास्त पद्धतींचा वापर करू तितका आपला अंदाज बरोबर येईल. उदाहर्नार्थ: शाळा चांगली आहे की नाही हे ठरवताना शाळेचे मागील काही वर्षांचे उत्तीर्णाचे प्रमाण बघता येईल तसेच प्रत्येक वर्गात विद्यार्थी संख्या किती आहे, शाळेतिल शिक्षक किती अनुभवी आहेत, शाळेला कोण-कोणत्या प्रकारची गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळाली आहेत, वगैरे अनेक गोष्टी बघता येतील. आपण जितक्या जास्त वस्तुतिथिजन्य गोष्टीँची मदत घेवू तितकं चांगलं; त्यामुळे आपला निर्णय जास्त बरोबर यायला मदत होईल.


हे सगळं केल्यानंतरही आपला निर्णय १००% बरोबर येईलच याची शाश्वती नाही. पण शक्यता नक्कीच वाढलेली असते. ह्या सगळ्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमुळे अजुन एक महत्वाची गोष्टपण घडते ... ती म्हणजे आपल्याला हे नक्की माहित असतं की आपण कुठे-कुठे compromise करायला तयार झालो आहोत. ह्या कमी महत्वाच्या मुद्द्यांचा आपला अंदाज जर चुकला तरी आपला निर्णय चुकला असं आपल्याला वाटणार नाही. कारण मुळातच आपण पूर्ण विचार करून ते मुद्दे कमी महत्वाचे ठरवलेले असतात.



ह्या सर्वाउपर थोडाफार नशिबाचा भाग पण असतोच. आपण विचारच न केलेला किंवा आपल्या आवाक्यात नसलेला एखादा मुद्दा आपला निर्णय चूक ठरवायला कारणीभूत होवू शकतो. पण अशा वेळेला थोड़ा संयम ठेवून परिस्थिति आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणेच आपल्या हातात असते.

4 comments:

  1. आपण खुप छान लिहिता. समर्पक.

    ReplyDelete
  2. आपला लेख आवडला. शेवटला लिहीलेलं वाक्य -
    'अशा वेळेला थोड़ा संयम ठेवून परिस्थिति आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणेच आपल्या हातात असते.' हे मनोमन पटलं

    ReplyDelete
  3. अमित
    मस्त पकडलं आहेस. उशिरा ब्लॉग वाचल्याबद्दल माफ कर.
    साप्ताहिक सकाळ च्या दिवाळी २००९ अंकात, संजय भास्कर जोशींचा लेख बघ.

    ReplyDelete

हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आपला अभिप्राय अवश्य लिहा